भारताचा सुवर्णकाळ समजलं जाणारं ‘गुप्त साम्राज्य’ अत्यंत सुबक मूर्ति घडवण्यासाठी कारणीभूत ठरलं.. गुप्तांमुळे आयुध पुरुषांना मूर्तिशास्त्रात वेगळे महत्व आणि उंची प्राप्त झाली.
उत्तर भारतात गुप्तांचे राज्य होते, त्यावेळेस महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात वाकाटक राजघराणे आपले वर्चस्व प्रस्थापित करत होते. विष्णूपूजक गुप्तांनी आपली मुलगी वाकाटकांच्या घरात दिली. ‘महाभैरव’ भक्त असलेलं शिवपूजक घराणं वाकाटक.. शैव-वैष्णव संप्रदायाचा मिलाफ झाला आणि वाकटकांनी सुद्धा विष्णूची पूजा करण्यास सुरुवात केली. ‘नंदीवर्धन’ राजधानी असलेल्या वाकाटक राजघराण्याची पट्टराणी, गुप्तांची मुलगी ‘प्रभावतीगुप्त’ ने वैष्णव संप्रदायाच्या प्रचारासाठी मेहनत घेतली. रामटेकच्या टेकडीवर केवल नृसिंहाचे मंदिर उभारले.. आपला पती, रुद्रसेनच्या स्मरणार्थ ‘रुद्र नरसिंह’ उभारला.. पण रामटेक पासून जवळ असलेलं ‘मनसर’ शैव संप्रदायाच्या खाणाखुणा आजही जपून आहे.
वाकटकांची एक शाखा ‘वत्सगुल्म’ ला स्थलांतरित झाली होती. ह्याच शाखेतील ‘राजा हरिषेन’ अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्यांचा निर्माता म्हणून इतिहासात अजरामर झाला. ‘राजा सिद्धार्थ ते गौतम बुद्ध’ हा प्रवास चित्रांच्या माध्यमातून आजही पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
इकडे एवढी उलथापालथ सुरू असताना दक्खनेत, वैष्णव-शैव धर्मियांनी प्रचंड सुंदर मंदिरे उभारण्यास सुरुवात केली होती. ऐहोळे, पट्टडकल्लू, महाकुट, बदामी या आणि अशा कित्येक ठिकाणी शैव, वैष्णव, सौर, शाक्त, संप्रदायातील कित्येक मंदिरे उभारण्यात आली. चालुक्य राजांनी दक्खनेत मोठी चळवळ उभारली. पुलकेशी राजाने तर दुमजली जैन मंदिर उभारले..
तर दूर दक्षिणेत पल्लव राजाने पहिली लेणी खोदली. जैन धर्माचे पालन करणारा ‘महेंद्रवर्मन’ पुढे चालून शैव धर्माचा पालनकर्ता झाला. त्याच्या मुलाने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, पण सोबतच अखंड दगडात मोठमोठाल्या कलाकुसर निर्माण करून एक आश्चर्य जगासमोर ठेवले. ते आश्चर्य आजही आपल्याला ‘महाबलीपुरम’ ला पाहायला मिळेल. पुढे ‘राजसिंहवर्मन’ ने घराण्याचा वारसा चालवत मंदिर निर्मितीत क्रांती आणली.
हे सगळं सुरू होतं..
स्थापत्यशास्त्र वेगळ्या उंचीवर होतं..
आणि राष्ट्रकूट वेरूळला येऊन पोचले होते.. आत्ता कुठे महाराष्ट्रात एका अद्भुत दुनियेच्या निर्मितीस सुरुवात झाली होती..
-केतन पुरी