इसवी सन 1659 पर्यंत शिवाजी महाराजांचा विजापूरच्या आदिलशाहीसोबत जोरदार संघर्ष सुरू होता. यादरम्यान औरंगजेब दक्खनेतच होता.जुन्नरचा प्रसंग सोडल्यास, शिवाजी महाराजांनी मुघलांवर थेट वार केल्याचे उदाहरण सापडत नाही. त्यातही, उत्तर कोकण भागावरून मुघल-आदिलशाही राज्यांमधील संघर्षाचा फायदा उचलत शिवाजी महाराजांनी या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली होती. इकडे अफजलखान मारला.. पन्हाळ्यापर्यंत मुलुख जिंकला. विजापूरचा सरदार सिद्दी जौहर शिवरायांवर चालून आला. रुस्तमेजमासोबत कोल्हापूर नजीक मैदानी लढाईत शिवरायांना विजय मिळाला. हे सगळं सुरू असताना उत्तरेत औरंगजेबाने आपल्या तिन्ही भावांचा काटा काढत गादी बळकावली होती.
असं काय झालं, की विजापूरच्या विरोधात जबरदस्त संघर्ष सुरू असणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्यावर औरंगजेब मातब्बर मुघल सरदार पाठवतो.. सोबत लाखभर सैन्य देतो.. अफाट सामर्थ्य आणि पैसे देतो.. शाहिस्तेखान सारखी बडी असामी स्वराज्यावर चालून येते. काय कारण होते? जेव्हा आपण याचे उत्तर शोधू.. औरंगजेब दक्खनेचा सुभेदार असताना शिवाजी महाराज आणि त्याच्यात झालेला पत्रव्यवहार पाहू.. शहाजी महाराजसाहेबांच्या अटक आणि सुटकेच्या वेळेस शिवरायांनी केलेलं राजकारण लक्षपूर्वक पाहू, तेव्हा आपल्या लक्षात येईल, औरंगजेब शिवरायांना कधीच ओळखून बसला होता. ‘दक्खन’ सुभा सुरक्षित ठेवायचा असेल, तर शिवाजी महाराजांचे अस्तित्व संपवणे शहाणपणाचे ठरेल, याची त्याला जाणीव झाली होती.
आग्र्याच्या स्वारीवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील राजकारण हा प्रचंड भारी विषय आहे. आधी शिवछत्रपती त्या आग्र्याच्या किल्ल्यात गरजतात,
“तुम देखा, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाह देख्या । मै तुम्हारी मनसीब छोड्या । मेरा सिर काटके ले जावो तो ले जावो, मै पातशाहकी हजुरी नहीं चलता ।”
औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस असतो तो.. काबुल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून दक्खनपर्यंत पसरलेल्या खंडप्राय साम्राज्याच्या सर्वात प्रबळ माणसाचा वाढदिवस.. तेही पन्नासावा..
त्यानंतर शिवाजी महाराजांना नजरकैद करण्यात येतं.
महाराज म्हणतात, ‘मला माझ्या मुलुखात जायचंय..’
औरंगजेब म्हणतो, ‘आधी किल्ले, सगळा खजिना.. मग सुटका..’
महाराज म्हणतात, ‘माझ्याशिवाय माझे सेवक किल्ले तुमच्या स्वाधीन करणार नाहीत..’
औरंगजेब म्हणतो, ‘हरकत नाही. आपण वाट बघू.. आधी जरा काबुलच्या मोहिमेवर जाऊन या..’
महाराज रामसिंगला मध्यस्ती घालतात.. मोहीम टळते..
परत महाराज म्हणतात, ‘मी राजत्याग करतो. माझ्या मनात ईश्वरभक्ती करण्याची इच्छा निर्माण झाली आहे..’
औरंगजेब म्हणतो, ‘खुशाल प्रयगराजच्या किल्ल्यावर जाऊन ईश्वराची भक्ती करा. माझा किल्लेदार तुमची हरप्रकारे काळजी घेईल.’
प्रयगराजच्या किल्ल्यावर आपल्यासोबत काय होऊ शकतं, याचा महाराजांना अंदाज असतो.. महाराज परत डाव फिरवतात, ईश्वराची साधना साधूसंतांना, मुल्लाफकिरांना मिठाई वाटून करण्याचा निरोप कळवतात.
किती इंटरेस्टिंग आहे हे..
काय लेव्हलवर जाऊन राजकारण घडतंय.. आपण या गोष्टी फार सहजपणे सोडून पुढे सरकतो..
पण शिवाजी महाराज नावात एवढी दहशत होती, की शिवछत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेनंतर खुद्द औरंगजेबाला रात्री झोपण्यासाठी आपल्या बिछान्याभोवती सशस्त्र पहारेकऱ्यांना उभे करावे लागले. नमाज पढताना बाजूने नंग्या तेगी घेतलेले पठाण उभे करावे लागले.
आणि हे सगळं झाल्यावर, आग्र्याहून राजगडला पोचल्यावर शिवाजी महाराज औरंगजेबाला पत्र लिहीताना म्हणतात,
“तुम्हाला न सांगता आलो.. जरा गडबड झाली..”
आणि हे सगळं त्या अतिबलवान मुघलांच्या सम्राटाला निमूटपणे सहन करावं लागतं..
हे आपण जोपर्यंत समजून घेत नाहीत.. हे राजकारण जोपर्यंत आपल्याला उमगत नाही..
तोपर्यंत एक व्यक्ती म्हणून पुरुषार्थाची परिपूर्ण व्याख्या असणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आपल्याला समजणार नाहीत.
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर महाराजांनी कर्नाटकाची अतिप्रचंड मोहीम काढली. याच स्वारीदरम्यान, 6 ऑगस्ट 1677 रोजी ‘हर्बर्ट डी यागर’ नामक डच राजदूताने शिवरायांची तामिळनाडू मधील ‘वलीकंडापुरम’ येथे भेट घेतली. या भेटीचे वर्णन करताना हर्बर्ट लिहितो,
“आम्ही शामियान्यात जाऊन पोहोचलो. तो शामियाना अतिशय महागड्या कपड्याने तयार केलेला होता. त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर नसली तरीही तो श्रीमंत वाटत होता. शामियान्याच्या मधोमध राजाची गादी व्यवस्थित रचून ठेवलेली होती. त्यावर मखमलीचे कापड अंथरले होते. लोडतक्क्यांवर मोठ्या प्रमाणात सोन्याचे काम केलेले.. तेवढ्यात आपल्या दोन मंत्र्यांना घेऊन ‘तो’ आला.. त्याच्या पायात सुवर्णजडीत मोजडी होती. अंगावर महागडी वस्त्रे आणि त्यावर सोन्याच्या तारांचे काम.. डोक्यावर जिरेटोप सुद्धा सोन्याच्या कलाकुसरीने नटलेला.. हातात सोन्याची मूठ असलेली आणि विविध रत्नांनी रंगवलेली तलवार, म्यानेवर सोन्याचे काम.. असा तो सर्वार्थाने श्रीमंत, सुलक्षणी पराक्रमी ‘शिवाजीराजा’ आमच्या समोर येऊन उभा होता.. त्याच्या तेजाने आम्ही दिपून गेलो..”
मुघलांच्या राजाचे सिंहासन सोन्याचे.. राजपूत म्हणजे सोन्यात लोळणारी लढवय्या जमात.. गोळकोंड्याचा बादशाह म्हणजे दक्खनचा अतिश्रीमंत राजा.. आणि आपल्या शिवरायांची प्रतिमा आपण ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ अशा स्वरूपात रंगवतो. पण हा डच राजदूत, जो प्रत्यक्ष छत्रपतींना भेटलाय, तो मात्र शिवरायांना सर्वशक्तिमान, सार्वभौम सम्राट आणि श्रीमंत छत्रपती या भूमिकेत रंगवतो.
छत्रपती शिवराय आपल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य ‘कॉफी’ ने करत असल्याची नोंद डच साधनांमध्ये आढळते. हैद्राबाद मुक्कामी डच राजदूत शिवरायांना भेटण्यासाठी आले असता, त्यांनी शिवाजी महाराजांना काजू, पिस्ता, बदाम, द्राक्षे यांसारख्या भेटवस्तू दिल्या. बदल्यात शिवाजी महाराजांनी आपले कॉफी देऊन आदरतिथ्य केले अशी नोंद एका अनामिक डच व्यक्तीने करून ठेवली आहे.
याच डच लोकांच्या कागदपत्रांमध्ये शिवरायांना एक नवीन विशेषण देण्यात आलंय..
New Lord of karnataka.. कर्नाटकाचा नवा स्वामी..
‘आम्हा दक्षणियांची पातशाही दक्षणियांच्या हाती राहावी’ असे ठणकावून सांगणाऱ्या शिवछत्रपतींच्या मराठा साम्राज्याने आता दक्खन भागाचे नेतृत्व स्वीकारले आहे आणि त्यांच्या ताकदीसमोर आदिलशाही आणि कुत्बशाहीने गुढगे टेकवले आहेत.. त्यांच्या साथीने मुघलांशी चार हात करण्याची तयारी सुरू केली आहे. काही वर्षातच दिल्लीवर आक्रमण करून शिवरायांचे नेतृत्व देशाला मान्य करायला लावण्यासाठी या दोन्ही शाह्यांनी तलवारीला धार लावण्याची तयारी सुरू केली आहे.
हे चित्र एवढे दणदणीत आणि जबरदस्त आहे, की शिवछत्रपतींच्या भव्यदिव्य कर्तृत्वाच्या सोनेरी पर्वाचे उत्तुंग दर्शन आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही..
हे छत्रपती शिवराय आहेत..
त्यांचे राजकारण आहे.. मुत्सद्देगिरी आहे.. धूर्तपणा आहे, चाणाक्षपणा आहे..
त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे असाधारण पैलू आहेत..
हे छत्रपती शिवाजी महाराज आपण अभ्यासायला हवे.. समजून घ्यायला हवे..
सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
-केतन पुरी