जवळ-जवळ सर्वच मध्ययुगीन राजसत्तांचा ‘हत्ती’ हा आवडता प्राणी होता. मराठा, विजापुर, मुघल, गोळकोंडा यांच्या चित्रांमधून आपल्याला हत्तींच्या चित्रांना विशेष स्थान दिल्याचे आढळून येते.
प्राणी पाळणे, त्यांच्यासाठी विशेष सेवकांची नेमणूक करणे, त्यांच्या नावे चित्र तयार करणे या गोष्टी सर्रासपणे दिसून येतात. बदामी चालुक्य राजा विक्रमादित्य याच्या लाडक्या घोड्याचे, ‘चित्रकंठ’ चे नाव ताम्रपटामधून सतत वाचावयास मिळते. मराठ्यांच्या इतिहासाचा विचार केल्यास, छत्रपती शिवाजी महाराजांना निकोलाओ मनुचीने ‘अश्वारूढ’ चितारले आहे. त्याही चित्रात महाराजांच्या पांढऱ्या शुभ्र घोड्याचे अलंकार आपण स्पष्ट पाहू शकतो. तसेच, घोड्याचे कुंकवाने शुभलक्षणी केलेले पाय आणि गळ्यात घातलेलं वाघनखांचे लॉकेट ठळकपणे नजरेत भरते. थोरल्या शाहू छत्रपतींचा लाडक्या कुत्रा ‘खंड्या’ तसेच शिकारीसाठी त्यांनी पाळलेले चित्ते आपल्याला बऱ्याच समकालीन चित्रांमधून पाहायला मिळतात. एवढंच कशाला ‘बचेरुस’ नामक डच राजदूताचे एक चित्र आज उपलब्ध आहे. एक विदेशी प्रजातीचे आणि एक देशी अशी दोन कुत्री त्याने पाळली होती. त्याच्या चित्रामध्ये या दोन्ही कुत्र्यांचे दर्शन चित्रकार आपल्याला घडवतो.. तेही ठळक वैशिष्ट्यांसहीत..
चित्रकलेत हत्ती दाखवणे हे प्रचंड मौल्यवान काम समजले जात असे. युद्धामध्ये त्यांची अफाट ताकद आणि अतिमहत्वाच्या समारंभाप्रसंगी त्यावर आरूढ होत प्रतिष्ठेचे भव्य प्रदर्शन करण्यासाठी हत्तीच कामाला येत. त्यामुळे हत्ती राजांसोबत चित्रकारांचे सुद्धा लाडके असत. म्हणजे, शिवराज्याभिषेकाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज हत्तीवर स्वार झाले.. तर प्रतापगडाच्या पायथ्याला युद्ध करण्यासाठी राजाराम महाराजांनी आणि पानिपतच्या मैदानात युद्ध करण्यासाठी सदाशिवरावभाऊंनी हत्तीची निवड केली होती. सदाशिवराव भाऊची हत्तीची अंबारी रिकामी दिसल्यामुळे भर युद्धात काय गोंधळ उडाला होता, याची सर्वांनाच कल्पना आहे.
जहांगीरला प्राण्यांची प्रचंड आवड होती. प्राण्यांसाठी त्याने काय काय केलं, याचे सविस्तर वर्णन ‘जहांगीरनामा’ तसेच काही समकालीन कागदपत्रांमधून वाचायला मिळतात. त्याच्या आवडत्या हत्तींसाठी स्वतंत्र सेवकांची फौज असे. समारंभ, युद्ध, शिकार एवढंच काय तर स्वतःच्या मनोरंजनासाठी त्याची पहिली पसंद हत्ती होती. आपल्या भावाला ‘दनियाल’ ला त्याने कितीतरी प्राणी भेट दिले होते. हत्तींना अंघोळ करण्यासाठी त्याने गरम पाण्याचा तलाव तयार केल्याचे ऐकण्यात आहे.
मेवाड स्वारीनंतर ‘राजपुत्र खुर्रम’ ने आपल्या पित्याला ‘जहांगीर’ ला नववर्षाचे निमित्त साधून अठरा हत्ती भेट दिले. त्यामधील एक हत्ती बादशाहला प्रचंड आवडला. दुसऱ्याच दिवशी त्या हत्तीवर आरूढ होत बादशाह आपल्या राजधानीत फेरफटका मारण्यास निघाला, प्रजेवर त्याने ‘खैरात’ उधळली. तो हत्ती बादशाहचा लाडका हत्ती बनला. या हत्तीचे नाव ठेवण्यात आले, ‘आलम गुमान’..!!
पुढे मुघल दरबारातील सर्वोत्कृष्ट चित्रकार ‘बिचित्र’ याने या आलम गुमान चे चित्र काढले. बिचित्र हा मुघल दरबारातील सर्वोत्कृष्ट चित्रकारांपैकी एक.. दरबारी चित्रकलेत शाहजहान च्या काळात त्याचा हात कुणीही धरू शकत नव्हते. व्यक्ती त्याचबरोबर। प्राण्यांची चित्रे काढण्यात त्याने महारथ पटकावली होती. या बिचित्रने ‘आलम गुमान’ चे चित्र तयार केले. या चित्रामध्ये आपल्याला हत्तीच्या गळ्यात घालण्यात आलेली सोन्याची साखळी, त्याला बांधलेली घंटा, अंगावर टाकलेली महागड्या कापडाची झुल, सोन्यापासून आणि विविध रत्नांपासून बनवलेले अलंकार आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच, हत्तीच्या पोटाच्या खालील बाजूस, पायांच्या मधोमध एक फारसी लेख आपल्याला दिसतो.
شبیه عالم گمان کجراج
قیمت یک لک روپیه
म्हणजे, ‘शबीये आलम गुमान गजराज, किमते येक लक रुपये’
या चित्रांवर असणाऱ्या लेखांमधून प्राण्याचे नाव, त्याला कुणी-कधी-किती किमतीला खरेदी केले आणि तो प्राणी कुणाचा लाडका होता याविषयी माहिती मिळते. हा ‘आलम गुमान’ जहांगीरचा लाडका हत्ती होता. त्यामुळे बिचित्रने त्याचे सुंदर चित्र रेखाटले.
मराठे आणि हत्ती यांच्याविषयी माहिती पुढील भागात.ext which will be added later
-केतन पुरी