मंदिरांविषयी प्रचंड गैरसमज समाजात पसरलेले आहेत. विशेषतः प्रत्येक मंदिर एकतर पांडवांनी बांधले.. किंवा हेमाडपंथी असते. लोककथांमध्ये छुपे अर्थ असतात. त्या त्या स्थानिक पातळीवर या कथांच्या आधारे बरीच मिथके उजेडात येण्यास मदतसुद्धा होते. क्षेत्रमाहात्म्य-स्थानमाहात्म्य बऱ्याच वेळी महत्वाची पण विस्मृतीत गेलेली माहिती देतात.
हे सगळं खरं असलं, तरीही या गोष्टींना जास्त महत्व दिल्यामुळे मंदिर स्थापत्य आणि त्याची वैशिष्ट्ये झाकोळून गेली आहेत. मंदिर स्थापत्य, शिल्पकला आणि त्यामागील शास्त्र याविषयी फारसे कुणी बोलत नाही. मंदिर ओळखले जाते त्याच्या शैलीवरून किंवा त्याच्या प्रकारावरून.. मंदिराच्या प्रत्येक भागाला विशिष्ट नाव दिलेले आहे. अपराजितपृच्छा, समरांगण सूत्रधार, बृहत्संमिता, वास्तूशास्त्र इ. यांसारख्या ग्रंथांमधून आपल्याला त्याविषयी सखोल माहिती मिळते.
जसे की मंदिर लतीन नागर शैलीचे आहे, की भूमिज शैलीचे आहे, की शेखरी आहे, फमसाना आहे. द्राविड प्रकारातील शिखर असेल तर ते नागर-द्राविड आहे, वेसर द्राविड आहे की द्राविड-द्राविड आहे हे आपल्याला सहजपणे ओळखता येते.
किंवा ते त्रिरथ आहे, पंच रथ आहे, सप्तरथ आहे याचीही ओळख होते.
खांबाची रचना भद्रक प्रकारातील आहे की अष्टक प्रकारातील आहे की इतर कोणती आहे हेसुद्धा समजते. किंवा मंदिराचे भाग ज्यात आपल्याला मुख्यकरून जगती, अधिष्ठान, जंघा आणि शिखर माहीत असते. पण खुर, कुंभ, जाड्यकुंभ, कपोत, नर-अश्व-गजथर वगैरे आपल्याला माहीत नसतात. मंदिर सांधार आहे की निरंधार हे तर आपण ऐकलेलं नसतं.
मंदिरांची निर्मिती का झाली? हा प्रश्न फारसा आपल्याला पडत नाही. त्याची निर्मिती कोणत्या काळात झाली, त्याकाळात त्या भागावर कुणाची सत्ता होती, ते राजघराणे त्यावेळी कुणाचे मांडलिक होते, तिथे त्याच धर्माचे/पंथाचे मंदिर का बांधण्यात आले, त्यावर कोणत्या राजकीय घराण्याच्या स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे. मग मंदिराच्या मुख्य भागांचा अभ्यास करायला पुढे जायला पाहिजे.
हे सगळं माहीत झालं नाही, तरी काही फरक पडत नाही. त्याने आयुष्यातसुद्धा असा काही फारसा फरक पडत नाही. पण आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या या वास्तू कोणतातरी संदेश यामधून देण्याचा प्रयत्न करतात. मंदिर आणि शिल्प तत्कालीन समाजव्यवस्थेच्या सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक-धार्मिक-राजकीय बाजूंवर भाष्य करणारे साक्षीदार आहेत. तत्कालीन लिखित पुराव्यांच्या अभावी जो इतिहास सांगायचा असतो, त्याला याच दृश्यकलेची जोड मिळते. निदान त्यांच्याविषयी अस्तित्वाचा जवळ जाणारी तरी माहिती आपण घ्यायला हवी.
नाहीतर आपल्याच पूर्वजांनी मोठ्या कष्टाने रक्त आणि घाम सांडून, आयुष्याची कित्येक वर्षे घालवून बनवलेलं सर्वांगसुंदर ‘कैलास लेणं’ एलियनने बांधलय किंवा बाराव्या शतकात हळेबिडूच्या मंदिरावर रणवाद्य वाजवणाऱ्या लोकांना ‘स्ट्रॉने नारळ पाणी पिणारे आधुनिक लोकं’ हे सांगायला कुणाचे फारसे कष्ट लागत नाहीत. एकटा ‘प्रवीण मोहन’ सर्वांना पुरून उरतो.
सत्याच्या जवळ जाणारा, वस्तुस्थितीची मोडतोड न करणारा इतिहास शाश्वत सत्य असते. तो बहुतेक वेळेस रुचकर वाटत नाही, ऐकताना रोमांचक भासत नाही. म्हणून ह्या कुबड्यांचा आधार घेतला जातो.
या कुबड्या फार काळ बाळगण्याची आता गरज वाटत नाही.. कदाचित..!!
(p. s. – प्रवीण मोहन मुळे अभ्यासकांच्या दोनेक पिढ्या फक्त त्याच्या युट्युब विडिओचं खरं खोटं करण्यात जाणार आहेत. महान आत्म्याला आणि त्याच्या भक्तांना सलाम.. )
-केतन पुरी