अठरा दिवसांचा बादशाह

अठरा दिवसांचा बादशाह, मुघलांची भाऊबंदकीची परंपरा आणि ती संपवणारे  मराठे..

खाली दिलेलं पेंटींग हे मुघलांच्या उत्तरकाळात तयार करण्यात आलेल सर्वात महागडं पेंटींग. हे चित्र पूर्णपणे सोन्याने तयार केलेलं आहे. चित्राच्या मध्यभागी असलेलं सिंहासन सोन्याचे, त्यावर पाचू, माणिके लावलेले.. सोन्याच्या कलाकुसरीने नटलेले सिंहासनाचे खांब, त्यावर दाखवलेलं कापड सोन्याचे, सोन्याचे तबक, हिरव्या रंगाचे कपडे घातलेला धर्मगुरू आणि त्याच्या हातात असणाऱ्या  तबकात पन्ना वगैरे रत्नांनी सजलेली तलवार, कट्यार.. गादीवर बसलेला बादशाह ‘अझीम-उद-दीन’.. त्याच्या मागे संपूर्ण सोन्याने तयार केलेली मुघलांची सार्वभौमत्व दाखवणारी चिन्हे.. सोन्याची पगडी, सोन्याचे मानदंड, हत्तीवर झुलणारे कापड सोन्याचे, सोन्याची कर्णे.. दूरवर दाखवलेला नौबत खाना.. आणि डोक्याच्या मागे दाखवलेल्या प्रभावळीमधून बाहेर पडणारी सुवर्णकिरणे.. या पेंटींगमध्ये रंग कमी आणि सोने, महागडी रत्ने यांचाच वापर केलाय. जणू काही एखाद्या चित्रकाराने नव्हे तर एखाद्या सोनाराने या चित्राची निर्मिती केली आहे..

चित्रात दाखवलेला ‘अझीम-उद-दीन’ बहादुर शाह चा दुसरा मुलगा. बहादूरशाह ला लाहोर येथे मृत्यू झाल्यानंतर त्याने तात्काळ गादीवर आपला अधिकार दाखवला. त्याच्या इतर तीन भवांच्या तुलनेत तो अतिशय सामर्थ्यवान होता. अझीम गादीवर बसून अठराही दिवस झाले नाहीत, तोच त्याच्या तीनही भावांनी त्याच्याविरुद्ध सैन्य जमा केले. रावी नदीच्या किनारी या चारही भावांची गाठ पडली. अझीम हत्तीवर स्वार झाला होता. भयंकर युद्धाला सुरुवात झाली. लढता-लढता अझीमचा हत्ती पिसाळला आणि सैरावैरा धावू लागला. त्या गडबडीत हत्ती रावी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. नदीच्या भोवती असलेल्या दलदलीत रुतला.. हळू हळू हत्ती त्यामध्ये बुडण्यास सुरुवात झाली. हत्तीवर बसलेला अझीम सुद्धा त्यामध्ये अडकला. हत्तीसोबत आपला बादशाह जमिनीत गायब होतोय, हे पाहत सगळेजण शांत उभे होते. थोड्याच वेळात तो हत्ती, अझीम आणि मुघलांचे भविष्य त्या रावीच्या दलदलीत बुडून गेले.

अझीम मेला.. आता बहादुरशाहचे तीन मुलं युद्धभूमीवर होते. त्यातल्या जहांदर शाह याने आपल्या दोन भावांना मारून टाकले आणि मुघलांच्या गादीवर स्थानापन्न झाला. पण शांत बसेल ते मुघल कसले? अझीमच्या लाडक्या मुलाने आपल्या चुलत्याविरोधात बंड केला आणि जहांदर खान ला मारून गादी हस्तगत केली.. त्या मुलाचं नाव ‘फारुखसियार’….

ह्या पेंटींगचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या अठरा दिवसांचा बादशाह झालेल्या ‘अझीम-उद-दीन’ च्या राज्यारोहन प्रसंगाचे केलेले चित्रण.. अठरा दिवसांच्या धामधूमीच्या परिस्थितीत सुद्धा या मुघलांच्या युवराजाने आपला अभिषेक करून घेतला.. भला मोठा दरबार भरवला.. अल्पकाळ गादीवर बसलेल्या या बादशाहचे चित्र मुघलांच्या सर्वात श्रीमंत चित्रांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.

मुघलांचा एक बादशाह.. त्याचा अकाली मृत्यू होतो.. बादशाहच्या मुलांमध्ये वारसायुद्ध जुंपते.. त्यातला एकजण गादीवर आपला हक्क दाखवतो.. पुढे युद्धात त्याचा आपल्या सख्ख्या भावांकडून मृत्यू होतो.. मुघलांच्या खानदानात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथेप्रमाणे घडणारी ही गोष्ट..

पण जहांदर शाहच्या मृत्यूनंतर मात्र ही परंपरा मराठ्यांनी कायमची संपवली.. फारुखसियार गादीवर आला. इसवी सन 1719 साली मराठ्यांनी दिल्लीवर फार मोठी स्वारी केली. फारुखसियारचे नशीब फिरले. भर दरबारात त्याला तख्ताखाली खेचून त्याचे डोळे फोडले.. त्याला कोठडीत टाकले आणि नंतर त्याला धारदार शस्त्राने मारून टाकले. फारुखसियार नंतर मराठ्यांनी रफीउद्दराजत, रफीउद्दौला आणि रोशन अख्तर उर्फ महमूदशाह या तीन व्यक्तींना मुघलांच्या गादीवर बसवले.. अवघ्या वर्षभरात मराठ्यांनी दिल्लीच्या गादीवर चार बादशाह बदलले.

भाऊबंदकीचा वाद कायमचा मिटवून मराठ्यांनी दिल्लीच्या तख्ताचे भवितव्य निश्चित करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतली.. आणि याला कारणीभूत ठरले भारतवर्षसम्राट थोरले शाहू छत्रपती..

-केतन पुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *