बिचित्रचे चित्र

उत्तर मध्ययुगीन काळामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक चित्रशैली उदयास आल्या. त्यामध्ये मुघलांची शैली, गोवळकोंडा शैली, मराठा शैली यांनी प्रामुख्याने लोकप्रियता मिळवली. उत्तर भारतात तर शेकडो चित्रकार अकबर, जहांगीर, शाहजहान वगैरे बादशाहांच्या दरबारात कार्यरत होते. त्यांची नावे आणि त्यांनी काढलेली वैशिष्टयपूर्ण चित्रे यांची यादी करायची म्हणलं, तरी लांबलचक काम होईल.

अकबराच्या दरबारातील सय्यद अली आणि अबू समद यांनी बसवन, दसवंत आणि केसुदास यांना चित्रकलेचे प्रशिक्षण दिल्याचे उल्लेख आपल्याला समकालीन साधनांमध्ये वाचावयास मिळतात. उत्तर हिंदुस्तानी कलम आणि पर्शियन कलमचा अपूर्व संगम या काळात घडून आला. केशव, मुकुंद, लाल, मिस्कीन, माधव, फारुख कुलमाक, जगन, महेश, खेमकरण, तारा, हरबन्स यांसारखे अनेक चित्रकार अकबराच्या दरबारात कामाला होते. असे म्हणतात, की हुमायून जेव्हा शाह तहमस्प याच्या दरबारी आश्रयाला होता तेव्हा त्याने आपल्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी ‘मीर सय्यद अली’ आणि ‘ख्वाजा अबू समद’ या दोन चित्रकारांची नेमणूक केली होती. हे दोघे काही काळ अकबराच्या दरबारात सुद्धा कार्यरत होते. तेव्हा शाह तहमस्प याच्या दरबारात हेरात कलम फार प्रसिद्ध झाले होते. त्याचाच प्रभाव अकबराच्या काळातील काही चित्रांवर पडला.

शाहजहानच्या काळात ‘दिल्ली कलम’ नावाने नवीन प्रकार आग्र्याच्या दरबारात विकसित झाला. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दारा शुकोहच्या लग्नाची वरात. आपल्या पारंपारिक ‘सेहरा’ मध्ये घोड्यावर बसलेला दारा शुकोह आणि त्याच्या सोबत घोड्यावर बसलेला शाहजहान, संपूर्ण वरातीचे स्वागत करण्यासाठी थांबलेले वादक, संगीतकार, नृत्य कलाकार.. दूरवर अतिशय मोठ्या प्रमाणात होत असलेली आतिशबाजी आणि घोड्यावरून वाजवण्यात येणारे नगारे.. श्रीमंत धाटणीचे हे चित्र तयार केले ‘हाजी मदनी’ या कलाकाराने. ताजमहलच्या निर्मितीमध्ये या मदनीने सुद्धा योगदान दिले होते. एवढेच नव्हे, तर शाहजहानने त्याच्या कारकिर्दीत काही जुन्या चित्रांना नवीन रूप देण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. लाहोर, बिकानेर, अयोध्या आणि लखनऊ मध्ये या प्रकाराला चांगलीच पसंती मिळाली होती. मदनीने जुन्या चित्रांना नवीन रूप दिले, त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जहांगीरच्या काळातील झेब्र्याचे चित्र.. शाहजहानला आपल्या वडिलांच्या काळातील चित्रांचा संच दफ्तरखान्यात सापडला. त्या चित्रावर आकर्षक रंगरंगोटी शाहजहानच्या काळात करण्यात आली आणि सद्यस्थितीत ते चित्र राजघराण्याच्या महत्त्वाच्या चित्रांमध्ये समाविष्ट झाले.

जहांगीरच्या काळातील सर्व चित्रकारांमध्ये जे सर्वोच्च क्रमांकावरील चित्रकार आहेत त्यात ‘बिचित्र’ चा क्रमांक लागतो. अतिशय हरहुन्नरी कलाकार.. त्याने काढलेले आलम गुमान हत्तीचे चित्र, शाह जहानच्या राज्यरोहनाचे चित्र, दारा शुकोह चे चित्र आज प्रसिद्ध आहे. जहांगीर आणि शाहजहान या दोघांच्याही कारकीर्दीत त्याने दरबारी चित्रकार म्हणून काम केले. याच बिचित्रने जहांगीरचे एक चित्र रेखाटले आहे.

या चित्रात जहांगीर एका उंच आसनावर बसलेला आहे. त्याच्या समोर एकूण चार व्यक्ती उभ्या आहेत. त्यातील एकाला जहांगीर पवित्र ग्रंथ देतोय. तो एखादा सुफी संत असावा, असे अभ्यासक मानतात. दुसरा दाढीवाला व्यक्ती हा ओटोमन साम्राज्याचा बादशाह आहे. तिसरा व्यक्ती फार महत्वाचा आहे, इंग्लंडचा तत्कालीन ‘राजा जेम्स’.. इस्ट इंडिया कंपनीचा ‘थॉमस रो’ याच्यामार्फत जेम्सने जहांगीर सोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. ही कंपनी व्यापारासाठी भारतात पाय रुजवू पाहत होती. जहांगीरची मर्जी संपादन करणे गरजेचे होते. त्यासाठी ‘थोमस रो’ या इंग्रज वकिलाला मुघलांच्या दरबारात पाठवण्यात आले. तेव्हा जहांगीरने त्या इंग्रज वकिलाला काही रंगीत चित्रे भेट म्हणून दिल्याची नोंद आढळते. जहांगीरला चित्रांचा संग्रह करण्याची प्रचंड आवड होती. जहांगीरच्या काळात चित्रकलेमध्ये आमूलाग्र परिवर्तन होण्यास सुरुवात झाली होती. युरोपियन कलेची ओळख उत्तर हिंदुस्थानातील चित्रकारांना झाली होती आणि आपल्या चित्रांमध्ये ते या कलेचे काही नमुने सादर करण्याचा प्रयत्न करत होते. बिचित्रने हाच प्रयोग आपल्या चित्रामध्ये केला. भारतीय प्रतीमाशास्त्र आणि युरोपियन प्रतीकवाद याचे सुरेख मिश्रण त्याने आपल्या कलाकृतीमध्ये करण्याचा प्रयत्न केला.

सर्वात शेवटी जो व्यक्ती उभा आहे, तोच हा बिचित्र.. एक हत्ती, दोन घोडे आणि त्यांच्यासमोर एक महत्त्वाचा व्यक्ती काहीतरी जमिनीवरून उचलतो आहे, अशा प्रकारचे चित्र तो जहांगीरला दाखवत आहे, त्याला भेट देत आहे. या चित्रकाराने काढलेली चित्रे आज प्रचंड लोकप्रिय आहेत. मुघल दरबारी कला अंक युरोपियन कलेचे अतिशय सुरेख मिश्रण त्याने यशस्वीपणे करून दाखवले आहे.

शाहजहानच्या नंतर गादीवर आलेल्या औरंगजेबाने मात्र कलेवर निर्बंध घातले. दुर्दैव म्हणा किंवा आश्चर्याची बाब, औरंगजेबाने कलेवर बंधन घालणारा बादशाह म्हणून लौकिक मिळवला, पण आजमितीस इतर मुघल बादशाहांपेक्षा सर्वात जास्त चित्रे याच औरंगजेबाची उपलब्ध आहेत. अगदी त्याच्या दक्खनच्या स्वारीची सुद्धा चित्रे प्रसिद्ध आहेत. मराठ्यांचा मुघलांसोबतचा राजकीय संघर्ष रोमांचकारी आहे, पण तत्कालीन काळात कला, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतरे अभ्यासणे हेही फार मजेशीर आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आणि त्याच्या मृत्यूनंतर अनेक मुघल दरबारातील चित्रकारांनी इतर राज्यात आसरा घेणे पसंद केले. त्यामुळे बऱ्याच भागातील चित्रशैली वर उत्तर हिंदुस्थानाच्या शैलीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो, अस्तित्व ठळकपणे जाणवते.

जहांगीर आणि झेब्र्याच्या चित्राची गोष्टसुद्धा अशीच रोचक आहे.. त्याविषयी पुढील भागात.

-केतन पुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *