वेरूळचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांचा झालेला संगम..
एखादी लेणी पाहताना आपण एकतर्फी विचार करतो. एकाच दृष्टीने ती लेणी पाहतो त्यामुळे त्या वास्तूमध्ये असणारे अनेक बारकावे सहजपणे लक्षात येत नाहीत. आता कैलास लेणीचेच पहा ना.. ही लेणी तयार करण्यासाठी तब्बल चार राज्यांमध्ये असणारे लोक राबत होते. ते कसे ओळखायचे? वेरूळची लेणी क्रमांक 16 ‘कैलास लेणी’ जगप्रसिद्ध आहे. या लेणीची निर्मिती ही ‘कळस ते पाया’ या क्रमाने झाल्याचे अभ्यासक सांगतात. पण ही लेणी तयार करणारे कारागीर होते तरी कुठले?
कैलास लेणीची निर्मिती करणाऱ्या कारागिरांमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील कारागीर, मूर्तिकार तसेच स्थापतींचा समावेश होता. या तीन राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कारागिरांच्या टोळ्या वेरूळ परिसरात मुक्कामास होत्या.
म्हणजे, कैलास लेणीच्या मुख्य मंदिराचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्यावर आपल्याला गाभाऱ्याच्या बाजूने पाच लहान देवळे दिसतात. पल्लवांनी निर्माण केलेल्या महाबलीपुरम येथील अद्भुत धर्मराज रथाची ती हुबेहूब प्रतिकृती आहे.
कैलासच्या बाजूला एकाच दगडात तयार करण्यात आलेले दोन भव्य हत्ती तसेच मंदिराच्या अधिष्ठान भागात असलेला गजथर तयार करण्याचे कामसुद्धा पल्लवांच्या कारागिरांनीच तयार केले आहे.. कारण, महाबलीपुरम याठिकाणी सुद्धा असाच एका दगडात तयार केलेला हत्ती दिसून येतो.
चालुक्यांच्या कारागिरांकडे देवदेवतांच्या सुंदर, सुबक मूर्ति घडवण्याचे काम होते. कैलासच्या मुख्य दरवाज्याबाहेर असणारे दोन द्वारपाल हे पट्टडकल येथील विरुपाक्ष मंदिरात असणाऱ्या द्वारपालांशी अगदी हुबेहूब जुळतात. किंवा, कैलास मध्ये कोरण्यात आलेला नाग हा बदामी-पट्टडकलच्या नागांची आठवण करून देतो. किंवा कैलास लेणीची जी प्राकार-भिंत आहे, जिथून आपण मुख्य लेणीत प्रवेश करतो, त्याच्या बाजूला दशावतार आणि अष्टदिक्पाल कोरण्यात आले आहेत. त्यांचा आकार हा जवळ-जवळ आठ ते दहा फूट आहे. त्यात कोरलेला ‘वराह’ पट्टडकलच्या वराहची आठवण करून देतो. किंवा कैलास मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या मूर्त्यांचे स्वतंत्र कक्ष तयार केलेले आहे. पट्टडकल येथील मल्लिकार्जुन मंदिरात अगदी हुबेहूब गंगा, यमुना पाहायला मिळतात.
पट्टडकलच्या विरुपाक्ष मंदिरात कोरलेली रावणानुग्रह आणि कैलासच्या दक्षिण दिशेस कोरण्यात आलेली रावणानुग्रह प्रतिमा ‘झेरॉक्स कॉपी’ वाटाव्यात एवढ्या सारख्या आहेत.
आंध्रदेशात असणाऱ्या विजयवाडा येथील ‘मादन्ना-आकन्ना’ लेण्याची निर्मिती करणाऱ्या स्थापतींनी कैलासमध्ये सुद्धा योगदान दिले आहे. कैलासाची निर्मिती ही आधी कळस, मग पाया या नियमाने झालेली असली तरीही त्याचे खोदकाम करताना विविध टप्पे पाडण्यात आलेले होते आणि त्या-त्या टप्प्यामध्ये खोदकाम करून मूर्ती तसेच मंदिराच्या विविध भागांची निर्मिती करण्यात आली. खोदकामाचे टप्पे ठरवण्याचा अनुभव आंध्रातल्या स्थापतींकडे होता. याची कल्पना आपल्याला ‘मादन्ना-आकन्ना’ लेण्या पाहून येते.
किंवा महाबलीपुरम येथे असणारी ‘दुर्गा लेणी’ मधील महिषासुरमर्दिनी, पट्टडकल येथे विरुपाक्ष मंदिरात असणारी दुर्गा आणि वेरूळच्या कैलासमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेली दुर्गा अगदीच मिळत्याजुळत्या आहेत. महाबलीपुरम आणि वेरूळ येथील दुर्गेमध्ये तर प्रचंड साम्य आहे.
म्हणजे वेरूळच्या निर्मितीमागे केवळ राष्ट्रकूट राजांचेच कारागीर नाही तर आंध्रदेश, बदामी चालुक्य आणि पल्लवदेशातील तामिळ कारागिरांचे, स्थापतींचेसुद्धा योगदान आहे हे आपल्याला दिसून येते.
वेरूळ डोळसपणे पाहायला हवा. ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. तिथे लक्षपूर्वक पाहिले असता आपल्याला असे शेकडो पुरावे दिसून येतात.
शेवटी काय, या दगडांना सुद्धा बोलता येते.
फक्त आपल्याकडे त्यांची गोष्ट ऐकण्याची शक्ती हवी
-केतन पुरी