औरंगजेब आणि शिवछत्रपती

औरंगजेबाच्या सिंहसनासमोर एक वीस फुटांचा गालिचा पसरलेला असे. त्याच्या उजव्या बाजूस उभारलेला एक वजीर सोडला तर त्या 20 फुटामध्ये एकाही व्यक्तीने यायचे नाही हा नियम होता. दरबारी रिवाज होता. वजिराने सुद्धा बादशाह पासून पाच फुटांचे अंतर ठेवायचे. म्हणजे औरंगजेबाच्या सावलीत सुद्धा कुणी उभे राहायचे नाही. मुघलांच्या दरबाराची एक रीत असे. बादशाहने दरबारात प्रवेश केला, तो गादीवर बसला की समोर उभ्या असणाऱ्या सरदारांनी आपापल्या नजरा जमिनीकडे वळवायच्या. बादशाह जोवर दरबारात आहे, तोवर मान वर घ्यायची नाही. उभे आहात त्या जागेवर हालचाल करण्याचीही परवानगी नव्हती. दरबारातून निघून जाणे, ही तर दूरची गोष्ट.  बादशहाला ‘सजदा’ करावा लागत असे. त्याची ‘चाहर तस्लिम’ आणि ‘जमीनबोसी’ (जमिनीचे चुंबन घेणे) करावी लागत असे. काही बोलायचे असल्यास बादशहाची परवानगी घ्यायची, तोंडासमोर रुमाल धरून एकदम हळू आवाजात बोलायचे. छोटीशी चूक झाली, दरबाराचे रीतीरिवाज पाळले गेले नाहीत तर त्याची नोंद घेण्यास माणसे ठेवलेली असत. जागेवर शिक्षा घडत असे.

एकदा मात्र विचित्र प्रसंग घडला. औरंगजेबाचा दुधभाऊ ‘बहादूरखान कोकलताश’. एके दिवशी बोलता बोलता चुकून त्याचा पाय सिंहासनासमोरच्या 20 फुटी गालिच्याला लागला. चुकून घडलेल्या या घटनेने औरंगजेब एवढा संतापला, की भर दरबारात त्याने बहादूरखान ला सुनावले. ‘तुमची दृष्टी अधू झाली आहे. वृद्धापकाळामुळे आता तुम्हाला नीट दिसेनासे झाले आहे.’ या कडक शब्दात औरंगजेब आपल्या भावाला समज देत होता.

औरंगजेब कसा आहे पहा.

अशा या मुघलांच्या दरबारात, खुद्द बादशहाच्या 50 व्या वाढदिवसाला ‘मै पातशाहकी हजुरी नहीं चलता’ अशी गर्जना करत औरंगजेबाला पाठ दाखवून मराठ्यांचा ‘सिंह’ दरबारातून बाहेर पडला होता. हा केवळ औरंगजेबाचा अपमान नव्हता, तर काबूलपासून बंगालपावेतो आणि काश्मीर ते दख्खनपर्यंत पसरलेल्या अवाढव्य मुघल साम्राज्याला दिलेला जबरदस्त तडाखा होता. मुघल दरबारात एवढी मर्दुमकी दाखवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’..

‘शिवाजीने संपूर्ण आशिया खंडासोबत युद्ध छेडले आहे.’ अशी नोंद एका इंग्रज प्रवाशाने करून ठेवली आहे. शिवाजी महाराजांचा लढा ऐऱ्या-गैऱ्या राजासोबत नव्हता, तर एका खंडप्राय देशाएवढे साम्राज्य असणाऱ्या ‘औरंगजेब’ बादशाहसोबत होता. शिवरायांच्या ताकदीचा अंदाज येतो, तो इथे.

याच औरंगजेबामुळे शिवछत्रपतींची काही अस्सल चित्रे भारताबाहेर युरोपात जाऊन पोहोचली. आज जगभर शिवाजी महाराजांची चित्रे पसरली आहेत. त्याला औरंगजेब कारणीभूत ठरला.

याचीच ही गोष्ट आहे.. इतिहासाच्या पानांमध्ये दडून गेलेली..

-केतन पुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *